2 निवृत्त निबंधकांवर 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंडगार्डन परिसरातील विशेष निबंधक सहकारी संस्थेचा निबंधक आणि दोन निवृत्त निबंधकांवर 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक देवराम गिते (वय 36), नंदकिशोर रामचंद्र झिने (वय- 59), सतीश क्षीरसागर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गीते हे विशेष निबंधक सहकारी संस्थेत वरिष्ठ लिपिक आहेत. तर, झिने हे काही वर्षांपूर्वी सहायक निबंधक होते. सध्या कंत्राटी पध्दतीने काम करतात. तसेच आरोपी सतीश हे ही विभागीय सह निबंधक म्हणून कार्यालयातुन सेवा निवृत्त झाले आहेत.

यातील तक्रारदार व अन्य दोन यांचे जमिनी संबधाने उपनिबंधक/ सावकाराचे निबंधक जालना यांनी तसेच विभागीय निबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांनी तक्रारदार यांच्या प्रकरणांचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने दिला होता. त्या निकालाविरुद्ध पुनर्निरक्षणाचे (रिव्हिजन) अर्ज सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक सहकारी संस्था, म. राज्य, पुणे यांचेकडे विरोधी पक्षकाराने दाखल केले होते. त्या तीन रिव्हिजनपैकी दोन रिव्हिजनचे निकाल हे तक्रारदार यांचे विरोधात दिले गेले, उर्वरित एक निकाल महानिबंधक यांना सांगून तक्रारदार यांच्या बाजूने करून देतो असे सांगून तिघांनी 1 लाख रुपयांची लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीने लाचेची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –