20 हजाराची लाच घेताना आरोग्य पर्यवेक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन- पाथर्डी नगरपालिकेतील आरोग्य पर्यवेक्षकास शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या संस्थेकडून 20 हजार रूपयाची लाच घेताना अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे पाथर्डी नगरपालिकेसह संपुर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कुणाल पाटील असे लाच घेणार्‍या आरोग्य पर्यवेक्षकाचे नाव आहे. शहर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी एक पथक येणार आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च म्हणुन कुणाल पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये कुणाल पाटील हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवार) सापळा रचला. कुणाल पाटील यांनी सरकारी पंचासमक्ष 20 हजाराची लाच स्विकारल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गुन्हयाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.