Coronavirus : ‘कोरोना’चा सामना करू शकतात HIV वरील ‘ही’ 2 औषधे ? उत्पादन वाढवण्याच्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातल्या १०० पेक्षा अधिक देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढली आहे. चीनमध्ये हाहाकार माजवल्यानंतर आता हा व्हायरस जगभर आपले हात पाय पसरवत आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत ६० हुन अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे एका ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. असे असताना देखील अद्याप कोरोना वर ठोस लस किंवा औषध विकसित करण्यात आलेले नाही.

भारतीय वैद्यकीय तज्ञ या विषाणूवर उपाय शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं फॉर्मा कंपन्यांना दोन्ही औषधांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

HIV वरील औषधांचे उत्पादन वाढवण्यावर भर

बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं औषध कंपन्यांबरोबर मोठी बैठक घेतली होती. या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांनी सिपला, मायलन, ऑरोबिंदो आणि इतर कंपन्यांना एचआयव्हीवर रामबाण ठरणाऱ्या औषधांचं उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. Lopinavir अन् Ritonavirचं अँटी रेट्रोवायरल औषधं आहेत. ही औषधं एचआयव्हीला शरीरातल्या इतर नसांमध्ये पसरण्यापासून रोखतात. भारत सध्या दोन्ही औषधांची निर्यात आफ्रिकी देशात करतो.

Lopinavir अन् Ritonavir च्या वापरामुळे प्रादुर्भाव रोखण्यात यश ?

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार मंत्रालयातले अधिकारी म्हणाले, कंपन्यांना दोन्ही औषधांचा पुरवठा आणि उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच या औषधांच्या निर्यातीवर कोणतीही बंधनं लादण्यात आलेली नाहीत. इटलीतून भारतात आलेल्या दाम्पत्यावर उपचारासाठी Lopinavir अन् Ritonavirचा वापर करण्यात आला. जयपूरमधल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या दोन्ही औषधांच्या वापरानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश येत असल्याचं उघड झालं आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, दोन्ही औषधे या जोडप्याच्या संमतीने दिली गेली आहेत. त्याचा परिणाम चांगला झाला. 14 दिवसांनंतर ते आता जवळजवळ निरोगी आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने आयसीएमआरला परवानगी दिली आहे की, एचआयव्ही-विरोधी औषधे Covid-19 वरच्या उपचारांसाठी वापरता येतील. कोरोना विषाणूचा सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही.