डॉ. पायलच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी सक्षम होणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयातील डॉ. पायलच्या रॅगिंग आणि आत्महत्येचे प्रकरण देशभरात गाजत आहे. वरिष्ठांनी वेळीच दखल घेतली असती तर डॉ. पायलचे प्राण वाचले असते हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. मात्र, डॉ. पायलचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आता मुंबई पालिका रुग्णालयातील अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी ती अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नायर रुग्णालयात पोस्ट गॅज्युएटच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्य़ा डॉ. पायल तडवी यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांना १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका रुग्णालयात पुन्हा रॅगिंगच्या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालयातील अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी अधिक सक्षम करण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. याप्रकरणी संबंधित रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रॅगिंगच्या घटना वारंवार घडू नये. यासाठी पालिकेने प्रयत्न करावे अशी मागणी सपाचे नेते रईस शेख यांनी पालिका सभागृहात केली होती. यानंतर पालिकेने अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व रुग्णालयांना याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

You might also like