‘रॅगिंग’विरोधी कायदा होणार अधिक ‘सक्षम’ ; राज्य सरकारचा निर्णय

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे आता रॅगिंग विरोधी कायद्यात आवश्यक त्या तरतुदी करुन हा कायदा अधिकाधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना पुरोगामी महाराष्ट्रात विद्यार्थिनींच्या बाबतीत रॅगिंगसारखे प्रकार घडणे दुर्दैवी आहे.

उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रॅगिंगला कंटाळून आपले जीवन संपवावे लागले ही निषेधार्ह बाब आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून, रॅगिंगविरोधी कायदा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. रॅगिंगविरोधी कायदा अस्तित्वात आहे; मात्र तो कायदा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.