‘हे’ बँडेज जखम बरी करून त्वचेतच मिसळते

मॉस्को : वृत्तसंस्था – संशोधक नेहमी काही ना काही नवे शोध लावत असतात. आता संशोधकांनी एक नवे बँडेज विकसित केले आहे. या अँटिबॅक्टेरियल बँडेजची खासियत अशी की, ते एकदा लावले की, हळूहळू त्वचेतच मिसळते. हे बँडेज त्वचेची वेगाने डागडुजी करते शिवाय संक्रमणापासूनही त्वचेचा बचाव करते. हे बँडेज एकदा लावले तर काढण्याची गरजही पडत नाही. याचा दीर्घकाळ उपयोग होऊ शकतो. याची विशेषता अशी की, हे डेज बायोडिग्रेडेबल असून ते हळूहळू त्वचेतच मिसळून जाते.
मॉस्कोच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच झेक प्रजासत्ताकच्या ब्रनो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने एकत्र येऊन हे बँडेज विकसित केले आहे. येथील संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत माहिती देताना संशोधक एलिजवेटा यांनी सांगितले की, “या बँडेजला पॉलिकापरोलेक्टोन नॅनोफायबरपासून बनवण्यात आले आहे. या फायबरमध्ये जेंटामायसिन असते व बँडेज हळूहळू त्वचेत मिसळून जाते. त्याचा वार करताच 48 तासांच्या आत बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूंची संख्या वेगाने कमी होते. सर्वसामान्यपणे जखम झाली की अँटिसेप्टिकचा वापर केला जातो. असे अँटिसेप्टिक बर्‍याचवेळा हानिकारक जीवाणूंबरोबरच शरीराला लाभदायक अशा जीवाणूंनाही नष्ट करतात.जे आपल्या शरीरासाठी चांगले नाही.”
‘साधारणपणे एखाद्याला जखम झाली तर वारंवार त्या जागेवर ड्रेसिंग करावे लागते. इतकेच नाही तर, रुग्णांना यादरम्यान मोठ्या वेदनेला सामोरे जावे लागते. आता हे नवे बँडेज ई-कोली या घातक बॅक्टेरियावरही परिणामकारक असल्याचे दिसले आहे, तसेच ते जखम भरून आणण्याबरोबरच हाडांच्या सूजसारख्या ऑस्टियोपोरोसिसमध्येही परिणामकारक आहे.’ असेही एलिजवेटा म्हटले.