मायकल जॅक्सनला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेट्स

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या फोटो, व्हिडीओ किंवा ट्विट्सच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर कायम चर्चेत असतात. यावेळी अनुपम खेर यांनी चक्क किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनमुळे चर्चेत आले आहेत. मायकलसोबतचा एक फोटो पोस्ट करुन त्यांनी काही जुन्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला आहे.
हा फोटो 1996चा आहे. त्यावेळी मायकल जॅक्सन भारतात आला होता.

मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन करुन त्याचे स्वागत केले. सुदैवाने त्या पार्टीला मी देखील हजर होतो. एका लहानशा स्टेजवर उभे राहून मायकल सर्वांचे अभिवादन स्विकारत होता. त्यावेळी मला राहावले नाही. मी थेट बॅरिकेट्स तोडून मायकलजवळ पोहोचलो पण तेवढ्यात त्याच्या सुरक्षारक्षकांनी मला अडवले. त्यावेळी भारत भाईंनी मायकल जॅक्सनशी माझी भेट करवून दिली होती. मायकलने माझ्यासोबत शेकहँड केले. आजही हा फोटो पाहिल्यावर ती घटना डोळ्यांसमोर उभी राहाते.

अशा आशयाची पोस्ट लिहून अनुपम खेर यांनी मायकलसोबतचा अनुभव सांगितला आहे.अनुपम खेर यांनी पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मायकल जॅक्सनचे चाहते जितके पाश्चिमात्य देशांमध्ये आहेत तितकेच भारतातही आहेत. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.