कंगनाचे कौतुक करत अनुपम खेर म्हणाले …

मुंबई : वृत्तसंस्था – अलीकडेच कंगनाचा ‘मणिकर्णिका’ चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात कंगनाने राणी लक्ष्मी बाई यांची भूमिका केली होती. या चित्रपटाची तिने दिग्दर्शक म्हणूनही धुरा सांभाळली होती. तिच्या या भूमिकेचे आणि चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. पण तिच्या चित्रपटाविषयी कोणत्याही बॉलिवूड कलाकाराने चकार शब्द सुद्धा काढला नाही. यावर कंगनाने नाराज होऊन काही कलाकारांवर निशाणा साधला होता. बॉलिवूडमधील एक कलाकार तिच्या आनंदात सहभागी न झाल्यामुळे तिने ही खंतही व्यक्त करुन दाखविली होती.

तिची ही खंत लक्षात घेत अभिनेता अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर कंगनाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना कंगना रॉकस्टार आहे, असं ते म्हणाले. ‘कंगना अत्यंत हुशार आणि धाडसी अभिनेत्री आहे. जे आहे ते कंगना स्पष्टपणे बोलते. अभिनयातही ती कसलेली आहे. कंगना म्हणजे महिला सबलीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. इतकंच नाही तर ती खरी रॉकस्टार आहे’, असे अनुपम खेर म्हणाले.

‘मणिकर्णिका’ रिलीज होण्यापूर्वी अनेक वादात सुद्धा अडकला होता. रिलीज होण्याआधी या चित्रपटाला काही लोक विरोध करत होती. यानंतर कंगना आणि डायरेक्टर क्रिश यांची भांडण यामुळेही चित्रपट चर्चेत राहिला होता. या चित्रपटात कंगना, अंकिता लोखंडे, वैभव तत्ववादी, डॅनी ,सुरेश ओबेरॉय यांसारखे कलाकार दिसले होते.