पालघर घटनेवर अनुपम खेर संतापले ! म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन  –   पालघरमधील एका गावात लोकांनी दोन साधूंसह तिघांना ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकरणावर सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा ट्विट करत घटनेचा निषेध व्यक्त केला.

‘पालघरमध्ये तीन साधूंच्या हत्येची घटना अत्यंत भयानक व दु:खद आहे. त्या घटनेचा व्हिडीओ मी शेवटपर्यंत पाहू शकत नाही. हे काय होते आहे? देशात काय घडतंय? हा मानवतेचा घोर अपराध आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली. अभिनेता फरहान अख्तरनेही या घटनेचा निषेध करत, देशात झुंडशाहीला थारा नाही दिला गेला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. तर अभिनेता सुमीत राघवनने ‘संतांची, वीरांची भूमी.. असे यापुढे बोलायचे टाळूया. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे’, अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला. पालघर प्रकरणाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती. तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे म्हटले आहे.