मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या (Anvay Naik Suicide Case) अनुषंगाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Republic Tv Chief Arnab Goswami ) यांनी बुधवारी (दि. 3) मुंबई उच्च न्यायालयात दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले आहेत. आरोपपत्राची प्रक्रिया तसेच तपास हस्तांतरित करण्याबाबतचे हे दोन्ही अर्ज आहेत.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह पुढील संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी विनंती अर्णब गोस्वामी यांच्या एका अर्जात केली आहे, तर अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय ) वर्ग करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती अर्णब यांनी दुस-या अर्जात केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब व अन्य दोन जणांवर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 306 आणि 34 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करावा, अशी अर्णब गोस्वामी यांची विनंती आहे.
अलिबाग येथील प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोन जणांना रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. या कारवाईवरून बरेच वादळ उठले होते. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने या तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर त्यांची रवानगी अलिबाग येथून तळोजा कारागृहात केली. दुसरीकडे त्यांची जामिनासाठी धडपड सुरू होती. अलिबाग कोर्टात तातडीने सुनावणीस नकार मिळाल्याने त्यांनी लगेचच मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना जामीन नाकारला. त्यानंतर अर्णब यांनी थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. तिथे सुनावणी होऊन अर्णब यांना जामीन मंजूर झाला आणि त्याच दिवशी तळोजा कारागृहातून त्यांना मुक्त केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्णब यांनी हे अर्ज मुंबई हायकोर्टात सादर केले आहेत.