माहितीच्या अधिकाराखाली कुणीतरी अर्ज करतो आणि नाहक चौकशीला सामोरे जावे लागते

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन – माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो आणि संस्थांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये वेळ, पैसा व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते असं वक्तव्य खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे. माळशिरस तालुक्यातील सहकारी व सेवाभावी संस्थांची बैठक मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी चारा छावण्यांविषयी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

माळशिरस तालुक्यातील २१ गावात दुष्काळामुळे सध्या मोठ्या प्रमाणात चारा टंचाई जाणवत आहे. त्यासाठी चारा छावणी सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात आली मात्र बैठकीत एकाही संस्थेने चारा छावणी सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली नाही. त्यामुळे विजय सिंह पाटील म्हणाले की , ‘शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या फायदा मिळविण्यासाठी चालविल्या जात नाहीत तर मुक्या प्राण्याला चारा, पाणी मिळावे म्हणून चालविल्या जातात, परंतु माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो आणि संस्थांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये वेळ, पैसा व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते. ‘ यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून चारा डेपो सुरु करावा, अशी मागणी केली.

चारा डेपो सुरु करण्याची मागणी –

माळशिरस तालुक्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाचे जाचक नियम, आर्थिक असक्षमता चौकशीचा ससेमिरा नको म्हणून कोणतीही सहकारी संस्था वा सेवाभावी संस्था चारा छावण्या चालविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील हजारो जनावरांवर उपासमारीची वेळ येऊन पडली. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्यापूर्वीच शासनाने या टंचाईग्रस्त २१ गावात येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरु करावा मागणी त्यांनी केली आहे.