चोरीच्या आरोपामुळे सहायक पोलिस निरीक्षकाची आत्महत्या ! 6 पोलीस अधिकाऱ्यांवर FIR

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या राज्य गुप्तचर विभागातून रायगड पोलीस दलात बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी चोरीचा खोटा आरोप करुन बदनामी केल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असून अलिबाग पोलिसांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह ६ पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अलिबाग येथील विश्रामगृहात प्रशांत कणेरकर यांनी १६ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पण, अलिबाग पोलिसांनी तब्बल १२ दिवस ही सुसाईड नोट गुलदस्त्यात ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये कणेरकर यांनी आपल्या आत्महत्येमागील सर्व कारणे व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नावे नमूद केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सुसाईड नोटामध्ये छळ करणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांसह काही बड्या अधिकाऱ्यांची नावे कणेरकर यांनी लिहिली असल्यानेच रायगड पोलीस हे प्रकरण दाबत असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु होती.

सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेकर हे मुंबई येथील राज्य गुप्तचर विभागात आजवर कार्यरत होते. त्यांचा सहकारी प्रशांत लांगी याने २०१८ मध्ये त्यांच्यावर पर्स चोरल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार त्याने अळकनुरे यांच्याकडे केली होती. अळकनुरे यांनी कणेरकर यांना मेमो देऊन त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविला होता. चोरीच्या या खोट्या आरोपामुळे कणेरकर हे खचले होते. अळकनुरे आणि लांगी यांच्यासह इनामदार, आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे, रवींद्र साळवी यावरुन त्यांच्यावर शेरेबाजी करुन त्यांना जाता येता टोमणे मारत असत. त्यात ३ महिन्यांपूर्वी कणेरकर यांची रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील तणावात वाढ झाली. पोलीस ठाण्याचा अनुभव नसल्याने त्यांची अर्ज शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. नव्या कामावर हजर झाल्यानंतर त्यांनी सुट्टी घेतली. काही दिवस आपल्या कुटुंबाबरोबर घालविले व त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी ते पुन्हा कामावर हजर झाले. त्यानंतर त्यांनी रायगड विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्यानंतर आता तब्बल दोन आठवड्यानंतर ६ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांची नावे अद्याप सांगण्यात आलेली नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –