सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर MS धोनीनं दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. एम एस धोनी सिनेमात सुशांतनं महेंद्र सिंह धोनीची भूमिका साकारली होती आणि साऱ्यांचं मन जिंकलं होतं. यावर आता एमएस धोनीनं प्रतिक्रिया दिली आहे.

एम एस धोनीवर तयार केलेल्या सिनेमाचे बिजनेस मॅनेजर अरुण पांडे यांनी माजी कॅप्टन कूल एम एस धोनीला सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितलं आहे.

अरुण पांडे म्हणाले, “एम एस धोनीला ही बातमी कळाल्यानंतर ते खूपच दु:खी झाले होते. आम्हाला यावर विश्वासच बसत नाहीये की, असं काही झालं आहे. मी माझ दु:ख व्यक्त करण्याच्या स्थितीतही नाहीये. माही खूपच उदास आहे. ही खूप वेदनादायक घटना आहे.”

पुढे बोलताना अरुण पांडे म्हणाले, “सुशांत केवळ 34 वर्षांचे होते. एक चांगलं करिअर त्यांची वाट पहात होतं. त्यांचं करिअर शानदार होतं याबाबत मला कसलीही शंका नाही. मला आजही आठवतं की, सुशांतला प्रॅक्टीस करताना इजा झाली होती. त्यांना हाडात क्रॅक गेलं होतं. परंतु त्यांच्यात खूप आत्मविश्वास होता. त्यांनी रिहॅबमध्ये खूप मेहनत केली आणि एक आठवड्याच्या आतच त्यांनी वापसी केली. माही त्यांचं कामाप्रति समर्पण पाहून खूप प्रभावित झाला होता.”