Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan | लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली - केंद्रीय मंत्री अमित शहा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan | वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले. (Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan)

 

राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा (Amit Saha) यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. (Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan)

 

केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले की, कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाज सेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन त्यांच्यासारखं लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांचे व राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो, असेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजापासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरू झाला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक चेतनेच्या जनकांची महाराष्ट्र ही भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे व ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेब, आप्पासाहेबांनी सुरू ठेवले आहे.

 

समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले. धर्माधिकारी कुटुंबियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये सुधारणा केली. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे.

 

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा – डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

 

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली. प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य हे श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचेही श्री. धर्माधिकारी म्हणाले.

 

देशाचे, आईवडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, हे प्रत्येकाने ठरविली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशसेवेबरोबर समाज सेवा करण्याचे काम मंत्री करीत आहेत. समाजसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले. त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवेत. त्यामार्फत वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. देशातील प्रत्येक मानवाचे आरोग्य सुदृढ असावे व आनंद आयुष्य जगावे यासाठी आरोग्य शिबिर घेत आहोत. रक्तदान व थॅलेसिमेया रुग्णांसाठी रक्त पुरवठा ही पण एक समाजसेवा आहे. आजपासून प्रत्येकाने ही सेवा सुरु करावी. राज्य शासनाचे जलसंधारणाचे मोठे काम सुरू आहे. त्याद्वारे पाणी जिरविण्याच्या कामातही योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

 

समाजसेवेबरोबरच अंतःकरणाची स्वच्छता महत्त्वाची असून यासाठी प्रत्येकाने मन स्वच्छ करायला हवे. तसेच मनाला स्थिरता प्राप्त करण्यासाठी अंतःकरणातील अस्वच्छता बाहेर काढणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाने अंर्तःआत्माला स्मरुन काम केले तरच उत्तम सामर्थ्य प्राप्त होईल. समाजसेवेचे हे काम अखंड सुरूच राहणार आहे यासाठी प्रत्येकाने सत्कीर्ती वाढवावी व अपकीर्ती थांबवावी, असा उपदेशही श्री. धर्माधिकारी यांनी यावेळी दिला.

 

उद्ध्वस्त कुटुंबांना वाचविण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर’ असे सांगत जनांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. याठिकाणी सकाळपासून भर उन्हामध्ये बसलेला एकही माणूस उठत नाही ही आप्पासाहेबांची ताकद आहे. प्रत्येक श्री सदस्य शिस्तीने काम करत असतो.

 

राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय शक्तीला अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते. त्याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून याचे रेकॉर्ड मोडायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्यामध्ये आप्पासाहेबांचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुटुंब उद्ध्वस्त होत असताना त्यांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं, असेही ते म्हणाले.

अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, आप्पासाहेबांनी केलं. मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्ही देखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते तसे माणसं जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस तू.. या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते, असे सांगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.

 

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे. आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेब स्वारीना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस सांगितले.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणाऱ्या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे. डॉ. सचिन धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव व मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे विचार येऊ लागतात. हे विचार आले नाही तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव व मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. प्रशासन व सदस्यांच्या समन्वयातून एवढा मोठा कार्यक्रम होत आहे.

 

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले.

पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द

कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.

 

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

भव्यदिव्य कार्यक्रम

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर हा भव्य समारंभ संपन्न झाला.
समारंभात पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, वाहनतळ सुविधा, श्री सदस्यांची बसण्याची व्यवस्था आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमस्थळी शासकीय यंत्रणेसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी व्यवस्था चोख सांभाळली.
या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक एकर मैदानात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक, श्रीसदस्य उपस्थित होते.
त्यांना कार्यक्रम व्यवस्थित दिसावा यासाठी एकूण 58 भव्यदिव्य असे एलईडी स्क्रिन उभारण्यात आले होते.
त्याचबरोबर प्रत्येक सदस्यांपर्यंत कार्यक्रमाचा आवाज पोहचावा, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारण्यात आली होती.

 

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन प्राची गडकरी यांनी केले होते.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर आधारित ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले स्वागत

 

खारघर गोल्फ कोर्सच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी आमदार महेश बालदी,
आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर,
माजी खासदार रामशेठ ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे,
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही श्री. शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ.
महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर,
ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी,
सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे,
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे आदी यावेळी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाची क्षणचित्रे

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात “जय सद्गुरु”
म्हणत केल्यावर श्री सदस्यांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या.

वीस लाखापेक्षा अधिक श्री सदस्य शिस्तबध्द रितीने बसून होते.

मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता शिंदे आणि पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
हे देखील आपल्या परिवारासह सर्वसामान्य श्री सदस्यांसारखे गर्दीत
उन्हात बसून कार्यक्रम पाहत होते.

कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशातूनही भाविक या कार्यक्रमासाठी दाखल.

 

Web Title :-  Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan | Padmashree Dr. Appasaheb Dharmadhikari
conferred Maharashtra Bhushan Award in the presence of lakhs of Shree members

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे-विमाननगर क्राईम न्यूज : हॉटेल व्यावसायिकाकडे 25 हजाराच्या खंडणीची मागणी, एकाला अटक

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

CM Eknath Shinde On Appasaheb Dharmadhikari | उध्वस्त कुटुंबांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं !
माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा; धर्माधिकारी प्रतिष्ठान दीपस्तंभासारखे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

DY Patil University | डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी : ‘होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया’ विषयावरील
परिषदेला चांगला प्रतिसाद; उद्यमशील कंपन्या, नवउद्योजकांना ‘होनहार भारत’ पुरस्कार प्रदान