दुचाकीच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरु करण्यात येणार असून पंसती क्रमांकासाठी वाहनधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.

दुचाकी वाहनांसाठी ‘एचए’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. आवडता क्रमांक हवा असणा-या वाहनधारकांनी अर्ज करावा. त्यासाठीचे आवश्‍यक शुल्क भरून तो क्रमांक देण्यात येणार आहे. दुचाकीच्या क्रमांकासाठी संबंधितांनी आवश्‍यक रकमेचा डीडी, पुराव्याचा पत्ता, ओळखपत्र आणि पॅनकार्डची झेरॉक्‍ससह आज मंगळवारी (दि. 10 ) सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे.

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्याची यादी बुधवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. त्याचदिवशी दुपारी साडेचार वाजता लिलावाद्वारे दुचाकी वाहनधारकांना त्यांचा पसंतीचा क्रमांक देण्यात येणार आहे. राखून ठेवण्यात आलेला क्रमांक बदलून देण्यात येणार नाही, याची नोंद वाहनधारकांनी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे.