ॲपल फोनमध्ये होणार ‘फोल्डेबल’ क्रांती; दोन घड्या घालता येणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोनमध्ये सातत्याने नवनवीन बदल घडून येत आहेत. मोबाईल ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मार्टफोनमधील बदल यशस्वी ठरताना दिसून येतात.ॲपल मोबाईल फोन ग्राहकांना नवनवीन फिचर पुरविण्यात नेहमीच दक्ष राहिला आहे. स्मार्टफोन ग्राहक सध्या फोल्डेबल मोबाईल फोनच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळं ॲपल देखील ही संधी सोडणार नाही, असं दिसत आहे. सॅमसंग आणि हुवावे या कंपन्यांनी या पूर्वीच फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यामुळं ॲपलनंही असा स्मार्टफोन बाजारात दाखल करण्याची तयारी केली आहे.

ॲपल कंपनीकडून दोन वेळा फोल्ड होणाऱ्या स्मार्टफोनचं पेटेंट दाखल करण्यात आलं आहे. या पेटेंटमध्ये दोन वेळा फोल्ड होणारं स्मार्टफोन डिव्हाइज दिसून येत असून या फोनची आतल्या आणि बाहेरच्या बाजूनंही घडी घालता येणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन उघडल्यानंतर टॅब स्वरूपात दिसेल.

मागील वर्षी ॲपलतर्फे स्क्रीनची घडी पडणाऱ्या एका उपकरणाचा प्रोटोटाइप दाखल करण्यात आला होता. परंतू त्यापूर्वीच सॅमसंग आणि इतर कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात लॉन्च करून बाजी मारली. ॲपल कंपनीकडून देखील फोल्डेबल फोनसाठी अनेक प्रयत्न केले गेले. ३७ वेळा यासाठी डिझाइन मागवण्यात आले होते. तसेच हा फोन १८० ते ९० डिग्रीपर्यंत हा फोल्ड करता येईल, असा दावा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा फोन एका फ्लेक्सीबल कव्हरच्या लेअर सारखा दिसणार असून या डिव्हाइसला सिरॅमिक मटीरियरच्या मदतीनं बनवण्यात येणार आहे. या फोनमधील पूर्ण डिस्प्ले वापरता येणार असून स्मार्टफोन आणि टॅबलेट अशा दोन्ही पद्धतीनं हे डिव्हाइज वापरता येईल.