Satara : LCB च्या पोलिस निरीक्षकपदी किशोर धुमाळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिन्यापासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) निरीक्षकपदी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रिक्त होते. आता निवडणूक झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) निरीक्षकपदी कर्‍हाड तालुका पोलीस ठाण्याचे किशोर धुमाळ यांची नियुक्त झाली आहे. यामुळे एलसीबीच्या कारभारासाठी सुरू असलेल्या चुरशीला आता पूर्णविराम मिळाला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यकाळात सुरुवातीला विजय कुंभार यांनी एलसीबीचे काम पाहिले; परंतु काही काळात त्यांच्याऐवजी सर्जेराव पाटील यांच्याकडे पदभार दिला गेला. त्यावेळी ते सोलापूर ग्रामीणमधून सातार्‍यात बदलून आले होते. गेल्या महिन्यामध्ये तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे. त्यांच्या पाठोपाठ सर्जेराव पाटील यांनी सोलापूर ग्रामीणची वाट धरली आहे. तेव्हापासून एलसीबीचे निरीक्षकपद रिक्त होते.

अजयुकमार बन्सल यांनी पोलीस अधीक्षक पद स्वीकारल्यानंतर सर्जेराव पाटील सोलापूरला गेले. जिल्ह्यातील महत्त्वाचे असे हे पद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले होते. अनेकांच्या माध्यमातून नेत्यांकडे शब्द टाकण्याची गळ घातली जात होती. त्याच पद्धतीने एलसीबीच्या कारभारपणासाठी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरून फिल्डिंग लागली होती, असे बोलले जात होते.

पूर्वीच्या कामाचे दाखले, ज्येष्ठता, जिल्ह्यातील अनुभव अशा विविध परिमाणांची कसोटी त्यासाठी लावली जाते. आपलाच माणूस असावा, यासाठी जिल्ह्यातील अनेक नेतेही त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, लगेच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एलसीबीच्या निरीक्षकांची निवडही लांबणीवर पडली.

या निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेची मुदतही संपली आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार अधीक्षकांनी तातडीने निर्णय घेत एलसीबीचे निरीक्षक म्हणून किशोर धुमाळ यांची नियुक्त केली आहे. मागील महिन्यापासून रखडलेल्या एलसीबीच्या कामकाजाला गती देण्याचे काम किशोर धुमाळ यांना आता करावे लागणार आहे.