राज्यातील ‘या’ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास मंजुरी

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन –  अलिबाग येथे सुरु होणाऱ्या सरकारी वैद्यकिय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरु होणार आहे. तेथील अध्यापकांची पदे तातडीने भरणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी 29 मे च्या पत्रान्वये शिफारस केली होती. त्यानुसार 44 अध्यापकांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याचे आदेश जारी केले आहेत.

100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी एकूण चार टप्प्यात गट अ ते गट क मधील नियमित 185 पदे, विद्यार्थी पदे 121 तसेच गट क काल्पनिक पदे 139 (बाह्यस्त्रोताने) व गट ड काल्पनिक पदे 65 (बाह्यस्त्रोताने) अशी एकूण 510 पदे निर्माण करण्यास शासन निर्णय 29 जानेवारी 2021 अन्वये मान्यता देण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

मंजूर पदाचे नाव आणि संख्या

गट – अ

अधिष्ठाता – 1, प्राध्यापक – 21, सहयोगी प्राध्यापक -22, मुख्य शासकीय अधिकारी -1 एकूण 45 पदे

गट – ब

सहाय्यक प्राध्यापक 46, प्रशासकीय अधिकारी -1 एकूण 47 पदे

गट – क

ग्रंथपाल -1, सांख्यिकी सहाय्यक -1, कार्यालयीन अधीक्षक -2, लघुलेखक – 9, वैद्यकीय समाजसेवक -4, वरिष्ठ सहाय्यक -15, रोखपाल -1, प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ -9, सहाय्यक ग्रंथपाल -2, वरिष्ठ लिपीक -13, लघुटंकलेखक -1, भांडारपाल-2, कनिष्ठ लिपीक -31, ग्रंथसूचीकार -1, प्रक्षेपक -1 एकूण पदसंख्या 93

बाह्यस्त्रोताने भरण्याची एकूण पदे – वर्ग 3 ची एकूण 139 तर वर्ग -4 ची एकूण 65 पदं भरली जाणार आहेत.