दौंड तालुक्यातून दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी

दौंड-अब्बास शेख – यवत पोलिसांकडून दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती यवतचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस निरीक्षक बंडगर यांनी दिलेल्या महितीनुसार, दौंड तालुक्यातील देलवडी येथे वाळूच्या वादातून झालेल्या खून प्रकरणी यवत पोलिसांनी मोक्कातर्गत कारवाई करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व भक्कम पुरावे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केली होती. त्यामध्ये देलवडी येथील खून प्रकरणातील आरोपी यांनी स्वप्नील उर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार याचा वाळूच्या लिलावातील पैशाच्या व्यवहारावरून व विशाखा कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट वरून आरोपी सोमनाथ शेलार याने त्याचे साथीदार नामे संतोष संपत जगताप, समीर संपत जगताप, अनिल तुकाराम मोहिते, दीपक दशरथ दंडवते, विशाल शिवाजी मेमाणे, रणजित बाळासो वांझरे यांनी मिळून लोखंडी कोयत्याने व दगडांनी डोके ठेचून खून केला होता. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी सोमनाथ शेलार याच्या सोबत गुन्हा करताना बबलू विश्वास डेंगळे, अनिल उर्फ सुनील अरुण शितोळे गुन्हा करताना हे देखील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यातील मयत पिंटू उर्फ स्वप्नील शेलार यास ठार मारण्याचा कट हा पुण्यातील भरती विद्यापीठ समोरील एका चायनीज हॉटेलमध्ये संतोष जगताप, समीर जगताप, अनिल मोहिते, दिपक दंडवते, सोमनाथ शेलार, विशाल मेमाणे, रणजित वांझरे, भूषण साबळे यांनी केल्याचे गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न आले असून मयतास ठार मारण्याचा जो कट केला त्या कटाबाबत पोलिसांना भक्कम पुरावा मिळालेला आहे.

यवतचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील आरोपी संतोष जगताप व समीर जगताप हे गेले बारा वर्षांपासून वाळू व्यवसाय करत असून त्यांनी सन २०११ सालात राहू येथे वाळू व्यवसायातील वादावरून  खून व खुनाचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांचेवर गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. पोलीस निरीक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद गुन्हा करणारे आरोपी हे संपूर्ण पुणे जिल्ह्यात व इतर जिल्ह्यातही वाळू व्यवसायात स्वतःची दहशत करून वाळू व्यवसाय करत असून ते वाळू व्यवसायातून वाद करून वरील स्वरूपाचे अत्यंत गंभीर गुन्हे करत असलेने त्यांचेवर मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत मा.संदीप पाटील सो, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी आदेश दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींवर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यातील कागदपत्रे व भक्कम पुरावे गोळा करून मोका कायदा कलम महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(¡¡), ३(४) अन्वये कारवाई करण्याबाबत परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला असून मा.विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र विश्वास नांगरे पाटील यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्तावास परवानगी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले.