दापोडीतील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मंजुरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडीतील जयभीमनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. ३६ इमारतींमध्ये एकूण सात हजार १४३ सदनिका बांधण्याच्या सुधारित खर्चाच्या उपसूचनेला शहर सुधारणा समितीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. यासाठी एक हजार ७५७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. जागेसाठी २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सभापती सीमा चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शहर सुधारणा समितीची विषेश सभा पार पडली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ७१ झोपडपट्टया असून, आतापर्यंत महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत नऊ गृहप्रकल्प राबविण्यात आले आहेत. प्रकल्प राबविलेल्याव्यरिक्‍त अन्य झोपडपटट्यांसाठी मेसर्स एम.एम. प्रोजेक्‍ट कन्सल्टंटस्‌ प्रा. लि. यांनी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प सादर करून त्याचे सादरीकरण केले आहे. मात्र, महापालिका हद्दीत प्रायोगिक तत्वावर क्‍लस्टरवाईज झोपडपट्टयांची विभागणी करून प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अन्य झोपडपट्टयांच्या पुनर्वसनाकरिता या सल्लागाराने सुमारे तीन हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. या सल्लागाराने क्‍लस्टर एकमध्ये भाटनगर पुनर्निमाण प्रकल्प व क्‍लस्टर दोनमध्ये दापोडी येथील सिध्दार्थनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरेवस्ती या झोपडपटट्यांचा समावेश आहे. दुस-या क्‍लस्टरमधील झोपडपटट्यांचा पुनर्वसन अहवाल सादर करण्याचा प्रस्तावासह एक हजार ९५७ कोटींच्या सुधारित खर्चाची उपसूचना शहर सुधारणा समितीमध्ये मंजुर करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये लाभार्थींना २६९ चौ. फूटांची सदनिका दिली जाणार आहे. यामध्ये विक्रीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय त्यामोबदल्यात कोणताही टिडीआर दिला जाणार नाही. या प्रकल्पासाठी गुगल मॅपनुसार एकूण सहा हजार ६९३ झोपडपट्टया आढळल्या आहेत. तर विकासकाला एकूण ३६ गृहप्रकल्पांमधून सात हजार १४३ सदनिका बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे.