हडपसर ते वाघोली चौपदरीकरणास मंजुरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्ग ९ पासून हडपसर- महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र. ५६ भाग मांजरी ते रेल्वे गेट ते मांजरी पूल काँक्रिटीकरणाद्वारे चौपदरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामकाजासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा रस्ता प्राधिकरणाच्या प्रस्तावित ११० मी. रुंद रिंगरोडच्या पुणे – सोलापूर व पुणे – शिरूर रस्त्याला जोडणारा आहे. त्याचप्रमाणे मांजरी, आव्हाळवाडी व वाघोली या तीन टीपी स्कीमकरिता पोच मार्ग आहे. या रस्त्याच्या विकास कामामुळे निवासी क्षेत्रास चालना मिळणार आहे.

त्याचप्रमाणे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे विविध भांडवली प्रकल्प राबविताना रस्ते विकास खासगी सहभागातून करण्यासाठी विविध आर्थिक नमुन्यांना (financing models) खासगी, सार्वजनिक सहभाग (पीपीपी) या विकल्पावर व इतर तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पीएमआरडीए हद्दीतील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी निर्मूलन, पर्जन्यजल व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी बृहत आराखडा (Master plan) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पुरंदर येथील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विकास कंपनीमध्ये सहभागी (Equity Shares) होण्यासाठी प्रशासकीय मान्यताही यावेळी देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विकास नियंत्रण नियमावली पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहेता , पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस मदान, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी यावेळी उपस्थित होते.