Pimpri News : मोशीत साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडियम

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडियम उभारण्यात येत आहे. या कामाला महापालिका सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममुळे भोसरीच्या नावलौकिकात भर पडणार आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा संकल्प व्हिजन -2020 अंतर्गत आमदार महेश लांडगे यांनी केला होता. त्या अनुषंगाने तब्बल 25 हजार आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. 11 एकर जागेवरील या उपसूचनेच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि. 8) मान्यता दिली आहे.

महापालिका सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. मोशी येथील सर्व्हे नं. 444 (जुना 445) आरक्षण क्रमांक 1/204 येथे बहुउद्देशीय स्टेडियम उभारण्याच्या कामाला मान्यता द्यावी, अशी उपसूचना माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली होती. या उपसूचनेला माजी महापौर राहुल जाधव यांनी अनुमोदन दिले आहे. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून हे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नाही. शहरातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित स्टेडियम महत्त्कांक्षी ठरणार आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आगामी दोन ते अडीच वर्षांत स्टेडियमचे काम पूर्ण होईल. स्टेडियममुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराची ओळख निर्माण होईल, असे बीआरटीएस विभागाचे उपअभियंता संजय साळी म्हणाले.

क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही देश-विदेशात गेलो आहे. त्यावेळी आपल्याही शहरात अशा प्रकारचे एक स्टेडियम असावे, देश- विदेशातील खेळाडू आपल्या शहरात यावेत, आपल्या शहराचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जावे, शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, अशी भावना होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे काम हाती घेतले आहे.