‘या’ दिवसांपासून सुरू होणार ST महामंडळाच्या Smart Card योजनेची नोंदणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी ३० नोव्हेंबरपर्यंत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदतवाढ ३१ मार्च पर्यंत दिली होती. मात्र, आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणी झाली नसेल अशांना १ एप्रिलनंतर स्मार्ट कार्ड नोंदणी करता येणार आहे. तर ज्यांची नोंदणी झाली त्यांना स्मार्ट कार्ड स्विकारता येणार आहे.

एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य होत नव्हते. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.

दरम्यान, स्मार्ट कार्ड योजना अद्याप राज्यात पूर्णपणे कार्यान्वित नाही. त्यामध्येच ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी नोंद केली नसेल त्या प्रवाशांना महामंडळातील प्रचलित पद्धत म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड, मतदान कार्ड बघून ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात सवलत मिळवता येणार आहे. ज्या प्रवाशांची नोंदणी किंवा स्मार्ट कार्ड मिळाले नसतील त्यांना ३१ मार्च नंतरही नोंदणी करता येणार आहे. तर स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेता येणार असून, यादरम्यान ज्या मार्गावर एसटी बसेस सुरू आहे. त्या मार्गावरील प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.