Balasaheb Thorat on Coronavirus : ‘एप्रिल महिना धोक्याचा, काळजी घ्या’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. अशातच एप्रिल महिना हा तर कोरोनाच्या संसर्गाबाबत अधिक धोक्याचा असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला लॉकडाउन टाळायचा आहे, त्यामुळे कडक निर्बंध लादण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येत्या काही तासांत याची नियमावली जाहीर केली जाणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

थोरात म्हणाले की, कडक निर्बंध म्हणजे लोकांनी कमीत कमी प्रमाणात एकत्र येणे असा आहे. त्यामुळे दुकाने, हॉटेलं आणि अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीकेंडला घराबाहेर पडतात यामुळे प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे वीकेंडच्या या दोन दिवशी कडक निर्बंध लादावेत अशी चर्चा बैठकीत झाली आहे. पहिल्या लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपण कडक निर्बंध आपण लागू करत आहोत. मात्र, शेवटचा पर्याय हा लॉकडाउन असतो हे विसरुन चालणार नाही. कडक निर्बंध लागू करताना लोक कुठेही अडकून पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असेही थोरात यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातही फोफावणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाबाबत गावातील प्रमुख लोकांनी नियंत्रण मिळवण्याबाबत काळजी घ्यावी. यात लग्न समारंभांतील संख्येचा मोठा परिणाम होतो, त्यामुळे या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याची अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे.