राज्य सरकारच्या याचिकेत अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकडून मध्यस्थी अर्ज, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळावेत. तसेच यासाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी करावे. ज्या मूळ खंडपीठाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले, त्याच खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी ठेवावी, अशी मागणी अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, पाटील यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. यावर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. “या याचिकेत मूळ आदेशाचा अन्वयार्थ लावण्यात येत असल्याने या याचिकेवरील सुनावणी ज्या खंडपीठाने आदेश दिले त्याच खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी व्हावी. तसेच मूळ याचिकादार आपण असल्याने आपल्यालाही प्रतिवादी करावे व आपलीही बाजू ऐकावी,” असं अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी नमूद केलं आहे.

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे सीबीआयला ५ एप्रिल रोजी आदेश दिले. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करून २१ एप्रिल रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाहेर जाऊन सीबीआय चौकशी करीत असल्याचा आरोप सरकारने केला आहे. मूळ याचिकेत म्हणजे जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेत ज्याचा उल्लेख नव्हता, त्याही बाबींचा सीबीआय तपास करत आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. ही याचिका गेल्या आठवड्यात न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाकडे होती.