Pune : कामशेतमध्ये अल्पवयीन तरुणाचा खून

कामशेत : पोलीसनामा ऑनलाइन – पैशाच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दोघांनी मिळून एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कामशेतमध्ये सोमवारी (दि.16) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना कामशेत पोलिसांनी अटक केली आहे.

समीर बाबू शेख (वय 17, रा. पंचशील कॉलनी, कामशेत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल सादिक शेख (वय 20, रा. सहारा कॉलनी, कामशेत), अल्ताफ लतिफ सय्यद (वय 20, रा. दत्त कॉलनी, कामशेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक वैभव सपकाळ यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख व यातील आरोपी साहिल शेख यांच्यात पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून वादा झाला होता. तसेच आईवरून शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवत चिडून जाऊन यातील दोन्ही आरोपींनी संगनमताने समीर शेख यास सोमवारी ( दि. 16) सायंकाळी दुचाकीवर बसवून जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या कामशेत खिंडीजवळील वन विभागाचे जागेत नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर वस्तारा व सुरीने वार करून तसेच दगडाने डोक्यात मारून त्याचा खून केला. त्यानंतर दोन्ही आरोपी फरार होते. कामशेत पोलिसांना बुधवारी आरोपी लोणावळा ग्रामीण येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आणि मोठ्या शिताफीने या दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. कदम तपास करत आहेत.