चेष्टा मस्करीतून वाद, तरुणावर कोयत्याने सपासप वार

खडकवासला/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चेष्टा मस्करीतून शिवीगाळ गेल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना डोणजे(Donje) येथील जिव्हाळा फार्म हाऊस येथे सोमवारी (दि.4) रात्री घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेखर शिवाजी पारगे (रा. डोणजे, ता. हवेली) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सज्जद शेख (रा. डोणजे, ता. हवेली) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. सज्जद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे. हवेली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीशी काही संबंध नसल्याचे हवेली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

आरोपी सज्जद आणि जखमी शेखर हे दोघे मित्र असून सिंहगड पायथ्याशी असलेल्या जिव्हाळा फार्म हाऊस येथे काल आपल्या मित्रांसह जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे गप्पांच्या मस्करीतून दोघांमध्ये वाद झाले. वादातून दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती. शेख तेथुन निघून गेला आणि थोड्या वेळात परत येऊन त्याने शेखरवर कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम करीत आहेत.