“लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक ; परंतू”

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप-शिवसेनेची युती झाली मात्र या युतीत मिठाचा खडा म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद आहे. युती झाल्यामुळे जालन्यातील जागा कोणाची असेल यावर यांचे वाद सुरु आहेत. अर्जुन खोतकरांनी दानवेंच्या विरोधात अनेकदा दंड थोपटले मात्र आता खोतकरांचा विरोध नरमला आहे. खोतकर कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या व्यक्तव्यातून त्यांची ही घुसमट दिसत आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे. यापूर्वीही माझी इच्छा मी जाहीरपणे व्यक्त केली. परंतु, मी शिवसैनिक असल्याने माझ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण आहे. माझ्यासाठी ती लक्ष्मण-रेषा आहे. युतीमुळे झालेल्या अवस्थेबाबत माझ्या भावना कळविणार आहे. मुंबईत जाऊन मी चर्चा करणार आहे, असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर झालेल्या विविध सर्वेक्षणाचे अहवाल माझ्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. मात्र, मी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती बांधिल आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकमेकांविरोधात उभे आहेत. गेल्या काही दिवसांपासून खोतकर उमेदवारी न दिल्यास काँग्रेसमध्ये जाणार आहे, अशी बातमी फिरत होती. मात्र हे खोटे असून आपण उद्धव ठाकरेंच्याप्रती बांधिल आहोत, अशी माहिती खोतकरांनी दिली आहे.