वडिलांच्या चॅम्पियन संघातून खेळणार मुलगा, मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 20 लाखात घेतले टीममध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी खेळाडूंचा लिलाव चेन्नई येथे झाला आहे. ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला 16.25 कोटीला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहेत. त्याचवेळी आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटींना विकत घेतले आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विकत घेतला आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने 20 लाखांमध्ये खरेदी केले आहे. सर्वांची नजर या 21 वर्षीय खेळाडूवर होती. अर्जुन तेंडुलकर आता आपल्या वडिलांंचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.

सचिन तेंडूलकर बराच काळ मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. आयपीएलच्या चार सीजनमध्ये तो या संघाचा कर्णधार होता. मात्र, त्याच्या नेतृत्वात आयपीएलची ट्रॉफी मुंबईला मिळू शकली नाही. अर्जुनने यावर्षी मुश्ताक अली टी -20 करंडक स्पर्धेत पदार्पण केले. नुकताच अर्जुनने एमआयजी क्रिकेट क्लबकडून खेळताना 31 चेंडूंत नाबाद 77 धावा केल्या. यासह अर्जुनने 3 गडीही बाद केले.

दरम्यान, आयपीएलच्या आठ फ्रँचायझी 61 जागा भरण्यासाठी बोली लावतात. ख्रिस मॉरिस आणि ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ची देखील जोरदार बोली लावली गेली. 50 लाखांची बेस प्राइम असलेला शिवम दुबे राजस्थान रॉयल्सने विकत घेतला. आरआरने त्याला 4.40 कोटींमध्ये खरेदी केले आहे. आयपीएल 2021 मध्ये शिवम दुबे संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहेत.