श्रीगोंद्यात मध्यरात्री सशस्त्र दरोडा आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती परिसरात राहणार्‍या घरावर ७ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. एका आदिवासी महिलेच्या घरात शिरुन त्यांनी तलवारीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देऊन ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ही महिला जखमी झाली असून तिला श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीगोंदा पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती परिसरात एक आदिवासी महिला राहते. मध्यरात्रीच्या सुमारास ७ दरोडेखोरांनी तिच्या घरावर दरोडा टाकला. तिला तलवारीचा धाक दाखविला. तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडील ३ हजार रुपयांचे दागिने व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन ते पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक आखिलेशकुमार हे श्रीगोंदा येथे आले असून त्यांनी घटनेची सर्व माहिती घेऊन तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तिघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे.