राज्यात ७ लाख कार्यकर्त्यांची फौज सक्रिय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत डिजिटल माध्यमाचा वापर करत ‘शक्ती’ नावाचे अ‍ॅप कार्यकर्त्यांसाठी आणले असून, त्या माध्यमातून राज्यात तब्बल ७ लाख कार्यकर्ते जोडले गेले आहेत. यासाठी काँग्रेसची वॉररूम, सज्ज झाली आहे. ‘जीओ इर्न्फमेटीक सीस्टिम’ च्या साहाय्याने राज्यातील सगळे बूथ गुगल मॅपद्वारे जोडले आहेत.

मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची वॉररूम असून वॉररूमचे प्रमुख माजी मंत्री सुरेश शेट्टी आहेत. अभिजीत सपकाळ यांनी या वॉररूमचा सेटअप तयार केला आहे. टिळक भवन येथे दोन मजल्यांवर जवळपास ५० ते ६० तरुण मुलामुलींची टीम चोवीस तास काम करत आहे. मुंबई काँग्रेसच्या टीममध्ये एमबीए, इंजिनीअर असे उच्च शिक्षित तरुण आहेत. कॉलसेंटर मधून जवळपास १२० ते १५० तरुण मुलेमुली काम करत आहेत. ‘शक्ती’ अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे, त्यांनाच आम्ही ‘घर घर काँग्रेस’ हे कॅम्पेन दिले आहे. आमचे कार्यकर्ते कोणत्या घरी गेले, तेथे ते कोणाला, कधी व किती वाजता भेटले, याची सगळी माहिती इथे मुंबईत बसून मिळते. आमच्याकडे ७ लाख कार्यकर्त्यांची माहिती गोळा झालेली आहे. आमचे कॉल सेंटर हे स्वत:हून काम करण्यासाठी आलेल्या उत्साही तरुणांचे आहे, पैसेवाल्यांचे नाही. एकूणच सोशल मीडियाचा वापर करून भाजपाच्या ट्रोल आर्मीकडून पसरविली जाणारी खोटी माहिती याचा भांडाफोड सोशल मीडियातून आमची टीम करत आहे. त्यासाठी ७ लाख कार्यकर्त्यांची फौज सक्रिय आहे असे अभिजीत सपकाळ यांनी सांगितले.