TikTok, PUBG सह ‘हे’ 89 अ‍ॅप्स मोबाइलमधून काढून टाका, भारतीय जवानांना आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून 89 अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम पबजीचाही समावेश आहे.

भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. लष्कराने टिंडरसारखे अ‍ॅपदेखील डिलीट करण्यास सांगितले आहे. याशिवाय काऊचसर्फिंग आणि बातम्यांसाठी वापरले जाणारे डेलीहंट हे अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे. 15 जुलैपर्यंत अ‍ॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.

याआधी भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापरण्यासाठी मुभा दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, सिग्नल, युट्यूब, ट्विटर यांचा वापर करण्यासाठी अधिकारी आणि जवानांना परवानगी आहे. मात्र या ठिकाणी लष्करामधील सेवेसंबधी माहिती उघड करु नये ही अट आहे.