छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, पंढरपूरातील घटना

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लष्करात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने छेडछाडीला कंटाळून राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पंढरपूर शहरात ही घटना घडली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहलेली सुसाईड नोट सापडली असून त्यात तिने भारतमाता आणि आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. तरुणीने सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावही लिहल्याचे आढळून आले आहे.

मुलीचा मृतदेह 7 डिसेंबरच्या सकाळी राहत्या घरात आढळला. पीडित तरुणीला तीन व्यक्तींकडून सतत त्रास दिला जात होता. त्याला कंटाळूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने तिचा हात पकडला होता तसेच याबद्दल कुठेही भाष्य करु नको असे धमकावले होते. याशिवाय आरोपी अनेकदा चिडवत होता. मुलीने आत्महत्या केल्याच्या तीन दिवसांनंतर कुटुंबीयाना सुसाईड नोट सापडली.

यामध्ये तिने लिहिले लष्करी गणवेश परिधान करण्याचे आणि त्यावर तिरंगा असण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरणार नाही, कारण आपण सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत आहोत अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भामसे यांनी दिली आहे.