मालीमध्ये लष्कराकडून सत्तापालट ! बंदूकीच्या धाकावर राष्ट्रपतींना केली अटक, दिला राजीनामा

बमको : वृत्त संस्था – मालीचे राष्ट्रपती इब्राहिम बोबकार किटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मालीमध्ये लष्कराने बंड केले आणि राष्ट्रपती व पंतप्रधानांना बंदूकीचा धाकावर अटक केली. ज्यानंतर या दोघांनी राजीनामा दिला आणि विद्यमान संसद बरखास्त केली. राष्ट्रपती म्हणाले, आज लष्कराच्या एका गटाने निर्णय घेतला आहे की, आता हस्तक्षेप जरूरी आहे, अशावेळी माझ्याकडे काही पर्याय असू शकतो का, मला रक्तपात नकोय, म्हणून मी राजीनामा देत आहे. या लष्करी बंडानंतर सत्तापालट झाले असले तरी देशाची सूत्रे कुणाच्या हातात जाणार हे अद्याप समोर आलेले नाही.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना असे केले अटक
राष्ट्रपती किटा आणि पंतप्रधान बोबू सिसे यांना लष्काराने बंदूकीचा धाक दाखवून अटक केली. मालीमध्ये मागील एक महिन्यापासून राजकीय अस्थिरता आहे. परंतु, बुधवारी लष्कराने सत्तापालट करत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अटक केली. लष्कराने मालीची राजधानी बमकोजवळील कातीमध्ये सशस्त्र बंड केले, ज्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अटक करण्यात आली. लष्कर आज दिवसभरात आपले वक्तव्य जारी करू शकते.

अनेक देशांनी केली टीका, यूएनमध्ये आपतकालीन बैठक
तर पश्चिम अफ्रीकेच्या अनेक देशांत या घटनेवर टीका होत आहे. फ्रान्स, युरोपियन युनियन, अफ्रीकन युनियनने सैनिकांच्या या कृतीवर टीका केली आहे आणि त्यांना या असंविधानिक सत्ता परिवर्तनावरून इशारा दिला आहे. बालीत मागील एक महिन्यापासून राजकीय संकट सुरू आहे. विरोधक मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रपतींना हटवण्याची मागणी करत होते आणि त्यांच्याविरोधात निदर्शने करत होते. विरोधकांचा त्यांच्यावर आरोप होता की, राष्ट्रपतींच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था बरबाद होत आहे.

युएनने केली टीका
मालीतील राजकीय घटनाक्रमावर युनायटेड नेशन्सचे लक्ष आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अटक केल्यानंतर युएनच्या सिक्युरिटी कॉन्सिलकडून आज दुपारी आपतकालीन बैठक बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये मालीमधील स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक बोलावण्याची मागणी फ्रान्स आणि नायजरकडून करण्यात आली होती. मालीच्या या घटनेनंतर युएनचे सेक्रेटरी जनरल अँटोनिया गुटारेस यांनी, तात्काळ राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सोडण्याची मागणी केली आहे. तसेच लष्कराच्या कृतीवर टीका करत संविधानिक पद्धतीने स्थिती सुरळीत करावी, असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले, आम्ही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहोत.