Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडू येथून शनिवारी (दि. 6) लष्करातील एका मेजर रँकच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणात लष्करातील आणखी काही बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या रविवारी सैन्याच्या रिलेशन आर्मी अंतर्गत पुण्यासह देशभरात तब्बल 43 ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा होती. परीक्षेसाठी देशभरातून 40 हजार उमेदवार बसले होते. मात्र या परिक्षेतील प्रश्नपत्रिका पुण्यात फुटल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वानवडी व विश्रांतवाडी येथे दाखल दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 7 ते 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर यात आणखी काही लष्करी अधिकाऱ्याची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले होते.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथून शनिवारी लष्करातील एका मेजर रँकच्या आधिकाऱ्याला अटक करून त्यास रविवारी पुण्यात आणण्यात आले. या अटकेमुळे एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.