प्राणाची आहुती देत लष्करी अधिकाऱ्यानं वाचवले 2 मुक्या प्राण्यांचे प्राण

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये घराला लागलेल्या आगीत फसलेल्या आपल्या कुत्र्यांचे प्राण वाचवताना लष्कर अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री या अधिकाऱ्याच्या घराला आग लागली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. एसएसटीसीमधील कोअर सिग्नलच्या कामाशी संबंधित मेजर बुधराज यांनी आपली पत्नी आणि एका कुत्र्याला आगीने वेढलेल्या घरातून सुखरुप बाहेर काढले. तर दुसऱ्या कुत्र्याला वाचवत असताना ते स्वत: 90 टक्के भाजून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेजर अंकित बुधराज असं या लष्करातील अधिकाऱ्याचे नाव आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आगीच्या ज्वाळांमध्ये फसलेल्या आपल्या दोन कुत्र्यांना वाचवण्यासाठी या लष्कराच्या मेजरने आपल प्राण गमावले. कुत्र्यांना वाचवत असताना गंभीर भाजल्याने या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सैन्य दलातील या अधिकाऱ्याच्या धैर्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. या घटनेची परिसरात चर्चा सुरु आहे. मुक्या प्राण्यासाठी या अधिकाऱ्याने आपल्या जीवाची आहुती दिली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण आणले. या पराक्रमी लष्करी अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेद आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उप-जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.