सैन्य भरतीचा पेपर फुटल्यामुळे देशातील परीक्षा रद्द, अनेक ठिकाणी कारवाई !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई करुन पेपर लिक करण्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन ठिकाणी समांतर कारवाई करण्यात आली असून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बारामती येथून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी लष्करातून सेवानिवृत्त वडिलांच्या मुलाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा मुळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रहिवासी आहे. अली अख्तर, महेंद्र सोनवणे, आझाद खान हे तिघे सैन्यभरतीचे पेपर लिक करणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. तसेच हे पेपर आदल्या दिवशी उमेदवारांना पुरवले जाणार असल्याचे समजले होते. त्यानुसार एकत्रपणे छापे घालून कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादी तरुण हा जानेवारी मध्ये झालेल्या मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मेडिकलमध्ये पास झाला. 6 फेब्रुवारी रोजी बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यानंतर त्याला आझाद खान भेटला. आझाद खान याने फिर्यादी तरुणाला सांगितले की, सध्या सुरु असलेल्या सोल्जर जीडी भरतीचे प्रमुख अख्तर खान व महेंद्र सोनावणे असून ते आपल्या ओळखीचे आहेत. त्यांना काही तरुणांना आर्मीमध्ये भर्ती करायचे असल्याचे सांगितले. यावर फिर्यादीने होकार दिला.

यानंतर फिर्यादी यांच्याकडे तीन लाख रुपयाची मागणी केली. तीन लाख रुपये दिले तर तुझे काम होइल असे सांगितले. परंतु त्याने दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. एक लाख रुपये अगोदर आणि एक लाख रुपये काम झाल्यानंतर देणार असल्याचे फिर्यादी याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी याने आझाद याला एक लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर आझादने त्याला काही सराव प्रश्नसंच व्हॉट्सॲपवर पाठवले. तसेच 28 फेब्रुवारीच्या परिक्षेसाठी 27 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता महेंद्र सोनवणे हा परीक्षेचा पेपर देणार असल्याची माहिती अली अख्तर याने सांगितले.

फिर्यादी हा शनिवारी पुण्यात आला. त्याने या तिघांशी संपर्क साधला मात्र तिघांनी फोन उचलला नाही. फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे दिली. याच दरम्यान पोलिसांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधल्यावर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.