रायगड : अर्णब गोस्वामी प्रकरणाचा 23 नोव्हेंबरला निकाल

रायगड : पोलिसनामा ऑनलाईन – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणातील संशयित रिपब्लिकन टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे . या निकालाची सुस्पष्टता प्रत मिळत नाही तोपर्यंत न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावर आणि अन्य आराेपींच्या जामीन अर्जावर निकाल देऊ नये, अशी विनंती आराेपींच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयाला केली. त्यामुळे न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी यांनी दिली.

रायगड पोलिसांनी ४ नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गाेस्वामी यांच्यासह फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना अटक केली हाेती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या समोर सर्वाना हजर केले. संशयितांना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता. मात्र न्यायालयाने संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी दिली हाेती. याविराेधात रायगड पाेलीस आणि सरकारने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यानंतर गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामीन मिळवला हाेता. गाेस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे, तर फिराेज शेख आणि नितेश सारडा यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यावर २३ नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे.