अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामींना दोषारोपपत्राला आव्हान देता येणार

पोलिसनामा ऑनलाईन – अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी व दोन जणांना अलिबाग पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेले आरोप फेटाळत गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. ९ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला गोस्वामी व अन्य दोघांवर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषारोपपत्राची दखल घेतल्याने, आम्हाला ते रेकॉर्डवर आणून त्यास आव्हान द्यायचे आहे. त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी, असे पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांना परवानगी दिली.

दोन वर्षे जुन्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याबद्दल आणि दोषारोपपत्र दाखल केल्याने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांची विनंती मान्य करत, अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाला गोस्वामी यांना दोषारोपपत्राची प्रत देण्याचे निर्देश देत या याचिकेवर ६ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली.अलिबाग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषारोपपत्राची दखल घेतल्याची माहिती गोस्वामी यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्या.एस.एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. त्यानंतर, दोषारोपपत्राला आव्हान देण्याची परवानगी उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिली.