भारतातील ‘या’ शहरात सांडपाण्याची घेतली ‘टेस्ट’, तब्बल 6 लाख लोकांना ‘कोरोना’ झाल्याचा अंदाज !

पोलिसनामा ऑनलाइन – हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) संस्थेकडून एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यातून शहरातील 6 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी शहरातील सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांची तपासणी केली असता गेल्या 35 दिवसात हैदराबादमधील 6 लाख लोकांना कोरोना झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जगभरातील अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या नमुन्यांवरून कोरोनाची साथ किती पसरली आहे याचा अंदाज घेतला जात आहे. कारण कोरोनाबाधित व्यक्तींच्या विष्ठेतही विषाणूंचे अंश असतात. असाच एक प्रयोग हैदराबादमध्ये करण्यात आला आहे.

एका दिवसाला हैदराबादमध्ये जवळपास 1800 दशलक्ष लिटर पाण्याचा वापर केला जातो. यापैकी 40 टक्के पाण्याचं नंतर विविध सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर शुद्धीकरण केलं जातं. कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी याच पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये जवळपास 2 लाख लोकांच्या विष्ठेत कोरोनाचे विषाणू आढळून आल्याचं समोर आलं आहे. परंतु हैदराबादमध्ये एकूण पाण्याचा जेवढा वापर केला जातो त्यापैकी केवळ 40 टक्के एवढंच सांडपाणी हे या केंद्रांकडे येतं. त्यामुळं उर्वरीत 60 टक्के एवढ्या पाण्यातही कोरोनाचे अंश असण्याची शक्यता आहे. हा सगळा विचार करूनच हैदराबादमध्ये जवळपास 6 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज CCMB नं वर्तवला आहे. हैदराबादमधील एकूण लोकसंख्येच्या 6 टक्के एवढं हे प्रमाण आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी सिरो सर्व्हे केला जात आहे. यापैकी जुलै महिन्यात मुंबईतील काही वॉर्डांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर झोपडपट्टीतील 57 टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष समोर आला होता. याशिवाय जे लोक इमारतीत राहतात त्यापैकी 16 टक्के लोकांना कोरोना झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.