राहुल गांधींच्या सभेला येणाऱ्यांसाठी ‘बियर’ ची व्यवस्था

भोपाळ : वृत्तसंस्था – २०१९ लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. नुकत्याच ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३ राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापन केली. विजयामुळे काँग्रेस आणि पराभवाच्या धक्क्यामुळे भाजप असे दोन्ही पक्ष येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. यासाठी देशभरात नेतेमंडळी ठिकठिकाणी सभा घेणे रॅली काढणे याचे नियोजन करत आहे.

रोज रोज या रॅली आणि सभांना सामान्य माणूस कुठे ना कुठे कंटाळून जातो. पण सभांना आणि रॅलीसाठी गर्दी असणे आवश्यक आहे, नाहीतर पक्षाकडे माणसे नाहीत असा त्याचा अर्थ होतो, शिवाय शक्तिप्रदर्शन करायचे असल्यास मग तर गर्दी पाहिजेच मग त्यासाठी अनेक युक्त्या तयार केल्या जातात. उदा. नट नट्यांना सभास्थळी आमंत्रित करून सामान्यांना आकर्षित करणे किंवा रॅली साठी “गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून देऊ तुम्ही फक्त या” अश्या अनेक गमतीशीर कल्पना लढवल्या जातात. त्यासाठीच काँग्रेसने वापरलेला फंडा मात्र अजबच होता. तसा तो पडद्यामागे वापरला जाणारा फंडा पण मध्यप्रदेशात उघडपणे वापरला गेला.

भोपाळमधील जंबूरी मैदानावर ८ फेब्रुवारीला काँग्रेसने आभार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. कार्यक्रमापासून काही अंतरावर जिल्हा काँग्रेस कमिटीने एक तंबू उभा केला होता. याठिकाणी येणाऱ्या बसमधील लोकांना थांबवून बीअर वाटली जात होती. बिअर वाटण्याचा हा कार्यक्रम सकाळी ११ पासून १ वाजेपर्यंत सुरू होता.

बिअरच्या बाटल्या वाटण्यासाठी एका माणसाकडे यासाठी खास कूपन दिले जात आहे. या प्रकरणावर पोलिसांनी म्हटलं आहे की, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथून तंबू काढण्यात आला होता.

सिवनीतील काँग्रेस नेता राजकुमार खुराना यांनी मात्र बीअरच्या बाटल्या नव्हत्या तर त्या ट्रेमध्ये खाद्यपदार्थ होते असं म्हटलं आहे. जर तिथे काही सापडलं असेल तर कोणीतरी गडबड केली असेल असं त्यांनी म्हटलं आहे.