पोलिसांनी अटक केल्यानं शासकीय विश्रामगृहाच्या 4 मजल्यावरून उडी मारून सराफी व्यावसायिकाची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनालाइन – चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्यांकडून घेतल्याच्या संशयावरून हैदराबाद पोलिसांनी नाशिकमधील एका सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतले होते. ही कारवाई हैदराबाद पोलिसांनी आज (दि.25) केली होती. या व्यवसायिकाची शासकीय विश्रामगृहात चौकशी सुरु असताना व्यावसायिकाने पोलिसांची नजर चुकवत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने व्यावसायिकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नाशिकमधील सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

विजय बुधा बिरारी (रा. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सराईत गुन्हेगार हैदराबादमध्ये जाऊन चोऱ्या करत होता. हैदराबाद पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान सराईत गुन्हेगाराने चोरीच्या गुन्ह्यातील सोने नाशिकमधील विजय बिरारी यांना दिल्याचे सांगितले.

हैदराबाद पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन नाशिकमध्ये आले. हैदराबाद पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या बिरारी यांना अटक केली. हैदराबाद पोलीस बिरारी यांना घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत आले. मात्र, याठिकाणी बिरारीने पोलिसांची नजर चुकवून बाल्कनीतून उडी मारत आत्महत्या केली.

दरम्यान, हैदराबाद पोलिसांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. विश्रामगृहात बिरारी यांच्याकडे कोणती चौकशी केली याची विचारणा नाशिक पोलिसांकडून करण्यात येत आहे. हैदराबाद पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न करता व्यावसायिकाला अटक केली. त्यामुळे त्यांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.