गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक; शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत गावठी पिस्तूल विक्री साठी आलेल्या दोन युवकांना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये स्वप्निल पोपट खटाटे व माणिक विलास मापारे असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत एका ढाब्यासमोर दोन युवक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, नाईक योगेश नागरगोजे, श्रीमंत होनमाने, संतोष शिंदे, बापू हडागळे, शंकर साळुंके, हरिष शितोळे, संतोष पवार, भास्कर भास्कर, अमोल दांडगे, सचिन होळकर, लक्ष्मण शिरसकर यांनी तळेगाव ढमढेरे न्हावरा रस्त्यालगत असलेल्या न्यू अर्जुन ढाब्या समोर जाऊन सापळा लावला असता त्यांना दोन संशयित युवक दुचाकी वरुन त्याठिकाणी आल्याचे पोलिसांना दिसले मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघे युवक पळून जाऊ लागले असता पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत त्या दोघांना पकडले यावेळेस त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली, यावेळी पोलिसांनी स्वप्निल पोपट खटाटे वय २२ वर्षे रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे व माणिक विलास मापारे वय ३५ वर्षे सध्या रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. टाकळी भिमा ता. शिरुर जि. पुणे या दोघांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.