अनिल अंबानी यांच्या विरोधात अटक वॉरंट

पाटणा : वृत्तसंस्था

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या विरोधात बिहारमधील मधेपूरा न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्युनंतरही त्यांच्या कुटुंबियांना मोबदला न दिल्याने हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून हे वॉरंट बजाविण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मधेपूरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे सैनी साह यांचा १३ जुलै २०११ मध्ये आसामाच्या तिलोई गावात ट्रक अपघात झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. पण कंपनीने पैसे दिले नाहीत. शेवटी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल केला.

[amazon_link asins=’B07CRMPS35′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6cf6f2d1-9940-11e8-adbc-ad3e9215f59c’]

न्यायालयाने त्यावर सैनी यांच्या कुटुंबियांना १८ लाख ४३ हजार रुपये आणि त्यावर ९ टक्के वार्षिक व्याज देण्याचा आदेश दिला होता. पण तरीही कंपनीने त्यांना मोबदला दिला नाही. त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कंपनीला दोनदा नोटीस पाठविली. पण कंपनीकडून कोणतेही उत्तर आले नाही.

तेव्हा कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने ही विंनती मान्य करुन महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत.