खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणा-या सराईत गुन्हेगाराला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने अटक केली. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेल व्यवस्थापकाला धमकावून खंडणीची मागणी केली होती. हा प्रकार २५ मे रोजी घडला होता. सचिन उर्फ बाबू शंकर मोहिते (वय – ३७) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

बाबू मोहिते याने हॉटेल व्यवस्थापकाकडे २५ हजार रुपयांची खंडणीची मागणी करत शिवीगाळ केली. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १० कडे सोपविण्यात आला होता.

 

गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेतला. गुन्हा केल्यानंतर आरोपी मोहिते आपली ओळख लपवून बसला होता. रविवारी रात्री तो मरोळ परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मोहिते याला शिताफिने अटक केली. बाबू मोहिते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खून, मारहाण आणि दंगलीचे गुन्हे पवई पोलीस ठाण्यात दाखल आहेत.