700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे (हवेली) : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी 700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील रेकॉर्डरूम मध्ये काम करणाऱ्या खासगी इसमाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात खळबळ उडाली आहे. संभाजी बापू धिवार (वय-४८) असे रंगेहाथ पकण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी हवेली दुय्यम निबंधक कार्य़ालयामध्ये आजोबांच्या नावे असलेले खरेदीखताची सत्यप्रत मिळावी यासाठी अर्ज केला होता. सत्यप्रत देण्यासाठी संभाजी धिवार याने तक्रारदाराकडे 1 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 700 रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याची तक्रार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पंचासमक्ष पडताळणी केली असता संभाजी धिवार याने 1 हजार रुपयांची मागणी करून 700 रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने आज सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्विकारताना धिवार याला रंगेहाथ पकडले. धिवार याच्यावर खडक पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –