Lonavala News : दुचाकीस्वाराला मारहाण करुन जबरी चोरी करणारे गजाआड

लोणावळा/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच त्या व्यक्तीकडील दुचाकी, सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. ही घटना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतवण गावाजवळील घुबड तलाव ते लोणावळा रोडवर सोमवारी (दि.18) रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सनी सुरेश मराठे, रोशन कैलास वाकोडे, गोविंद काशिनाथ हिरवे, संतोष शंकर आखाडे, कल्पेश ज्ञानेश्वर मराठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी हमिदुल्ला नसीबउल्ला खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमिदुल्ला हे त्यांची यामाहा कंपनीच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यांना दमबाजी व मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील दुचाकी, गळ्यातील चेन आणि 14 हजार 700 रोख रुपये असा एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

हमिदुल्ला यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पथक तयार करुन आरोपींचा शोध घेतला. आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपींची नावे पोलिसांना मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून यामाहा कंपनीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.

ही कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार युवराज बनसोडे, पोलीस नाईक मयूर अबनावे, रफिक शेख, पोलिस शिपाई रईस मुलाणी, हनुमंत शिंदे, होम गार्ड शुभम कराळे, पोलीस मित्र योगेश हांडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे हे करत आहेत.