चालत्या रिक्षात विनयभंग करणारा रिक्षाचालक अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली आहे. सहा आसनी रिक्षाद्वारे प्रवास करताना त्याने तिला भलत्याच ठिकाणी नेत विनयभंग केला. मात्र तिने चालू रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली होती.

जयवंत मारुती भुरुक (२७, कोल्हेवाडी, ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी खंडाळा पोलीस ठाण्यात दरोड्याचा तर  राजडगड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकऱणी पिडीत तरुणीने फिर्याद सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीदार तरुणी रात्रीच्यावेळी स्वारगेटहून एका सहा आसनी रिक्षात बसली. हिंगणे भागात एक महिला आणि पूरूष रिक्षातून उतरल्याने ती एकटीच रिक्षात राहिली. रिक्षाचालकाने धायरी भागात रिक्षा घेऊन जाणे अपेक्षित होते. परंतु त्याने रिक्षा सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला नेली. तेथून तो रिक्षा कालव्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रिक्षा माघारी आणून त्याने ती मुंबई-बंगळुरु बाहयवळण मार्गाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा वेगळ्याच दिशेला जात असल्याचे लक्षात आल्या र तिने त्याचा विचारले. त्यावर त्याने तिला नऱ्हे भागात थोडे काम असल्याचे सांगत पुढे नेले. त्यानंतर तिने गोल्ड जीमजवळ त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तिचा स्कार्फ ओढला. प्रसंगावधान राखत तिने रिक्षातून उडी मारली. नंतर आपल्या मित्राला फोन लावून झालेल्या प्रकारची कल्पना दिली.

त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांचे तपास पथकातील पोलीस क्रमचारी वणवे, शिंगारे, सोनवणे यांनी याप्रकरणाचा तपास करत असताना स्वारगेट येथील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांनी भुरुक याला केली अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आशा गायकवाड व त्यांच्या पथकाने केली.