घरफोड्या करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – दुकानांचे शटर उचकटून दुकानात चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने निफाडमधील चांदोरी येथील फॅब्रिकेशनच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.चांदोरी येथील फॅब्रिकेशनचे शटर उचकटून चोरी करण्यात आली होती.

ही घटना २२ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन महिला चोरी करताना आढळून आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलांचा शोध घेऊन गजाआड केले.मंगल सोनवणे, शारदा गरकडे, मंदा शारबिद्रे (सर्व रा. गंजमाळ, भिमवाडी, नाशिक) या महिलांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली.

गंजमाळ येथील मोईन अली हुसेन पठाण याच्या मदतीने चांदोरी येथील फॅब्रिकेशनच्या दुकानात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीचा मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. या टोळीने नाशिक शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. यातील महिला ह्या दिवसा भंगार गोळा करतात, त्याचवेळी बंद घरे व दुकानांची टेहळणी करतात. यानंतर पाळत ठेवून घरफोड्या करतात, असे समोर आले आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष आडसूळ, रवींद्र शिलावट, सुधाकर खरोले, नंदू काळे, राजू सांगळे, गोकुळ सांगळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, योगिनी नाईक यांच्या पथकाने केली.