उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन

भिगवण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून, उजनी जलाशयाच्या परिसरात स्थलांतर करणाऱ्या, गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे खास आकर्षण ठरणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. चालू वर्षी उजनी धरणामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे रोहित पक्ष्यांच्या आगमनास सुमारे एक महिन्याचा विलंब झाला. उशिरा का होईना पक्ष्यांचे आगमन झाल्याने पर्यटक, पक्षी अभ्यासक आणि पक्षी प्रमींसाठी सध्या ही पर्वणी ठरत आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव, तक्रारवाडी परिसरात रोहित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे.

उजनी धरणाच्या उभारणीनंतर मागील चाळीस वर्षापासून हिवाळी पर्यटनासाठी उजनी जलाशयाचे बॅकवॉटर एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. उजनी जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, नौका विहार, लाखो पक्ष्यांचा किलबिलाट, जलाशयावर विहार करणारे विविध प्रकारचे पक्षी, मच्छीमारांच्या होड्या, खमंग मासळीचे जेवण, सुर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृष्य सध्या उजनी बॅकवॉटरवर बघायला मिळत आहे.

रोहित पक्ष्यांसह विविध प्रजातींचे पक्षी या परिसरात त्यांच्या वसाहती थाटतात. मध्य आशिया, उत्तर सैबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या खंडात या पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासल्यानंतर साधारणत: नोव्हेंबर ते मार्च दरम्यान हे पक्षी उजनी जलाशयाकडे झेपावतात. महाराष्ट्रातील जायकवाडी, मुंबई, सातारा जिल्ह्यातील दहिवडी या ठिकाणीही काही प्रमाणात या पक्ष्यांचे वास्तव्य आढळते.

रोहित पक्ष्यांबरोबरच चित्रबलाक, राखी बगळे, पान कोंबड्या, बदक, सर्पमित्र, दविर्मुख, भोरड्या, नदीसूर, थापट्या, चक्रवाक, बहीर ससाणा यासारख्या पक्ष्यांची गर्दी जलाशयावर पहायला मिळते. सध्या विणीचा हंगाम (अंडी घालण्याचा काळ) असल्यामुळे पक्षी या ठिकाणी दाखल होत आहेत. पाणथळ आणि सुरक्षित ठिकाणी रोहित पक्षी आपल्या पिलांना जन्म देतात. पाच-सहा महिन्यांच्या काळात आपल्या पिलांच्या पंखात बळ दिल्यानंतर ते पुन्हा आपल्या मायदेशी परततात.

सध्या इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव, तक्रारवाडी तसेच दौंड तालुक्यातील खानोटा परिसरामध्ये रोहित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे. रोहित पक्ष्यांबरोबरच मंगोलियाहून स्थलांतरित बार हेडेड (पट्टकादंब) या अतिशय सुंदर पक्ष्यांचेही थवे येत आहेत. बगळ्यासारखी उंची, अग्निपंख, काटकीसारखे लांब पाय, उंच मान आणि रुबाबदारपणा यामुळे रोहित पक्षी हा पक्षीनिरीक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.